नवी दिल्ली - भाजपाचे खासदार साक्षी महाराज एका नवीन वादात अडकले आहेत. एका नाइट क्लबचं उद्घाटन केल्याच्या कारणामुळे साक्षी महाराजांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. चौफेर शाब्दिक हल्ले सुरू झाल्यानंतर साक्षी महाराजांनी यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. 'माझी फसवणूक करुन नाइट क्लबचं उद्घाटन करुन घेण्यात आले', असे स्पष्टीकरण साक्षी महाराज यांनी दिले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले. ''रज्जन सिंह चौहान नावाचा वकिलानं रविवारी लखनौ येथील अलिगंजमधील एका रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यासाठी मला घेऊन गेला'', असे साक्षी महाराज यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
रज्जन सिंह चौहानला रेस्टॉरंटचे मालक सुमित सिंह आणि अमित गुप्तानं उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. पत्रात त्यांनी असेही लिहिलंय की, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा प्रचंड घाईमध्ये होतो आणि केवळ 2 मिनिटांत फित कापून उद्घाटन झाल्यानंतर तातडीनं दिल्लीकडे येण्यासाठी रवाना झालो. उद्घाटनावेळी रज्जन सिंह चौहाननं सांगितलं की, रेस्टॉरंट त्याच्या जावयाचं असून फेब्रुवारी महिन्यात त्याची नोंदणीदेखील करण्यात आली आहे.
दरम्यान, आपण रेस्टॉरंटऐवजी नाइट क्लबचं उद्घाटन केल्याची माहिती मीडियाद्वारे समजल्याचे साक्षी महाराज यांनी सांगितले आहे. मी रेस्टॉरंटच्या मालकाकडून परवाना मागितला आहे. मात्र परवाना देण्यास त्यानं असमर्थता दर्शवली आहे, त्यामुळे हे सर्व काही अवैध पद्धतीनं सुरू असल्याचं मला वाटत आहे. शिवाय, या घटनेमुळे प्रतिमेला धक्का बसल्याचंही साक्षी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे संबंधित रेस्टॉरंटची चौकशी करुन जर यात काही अवैध बाब आढळल्यास त्याविरोधात बंदीची कारवाई करुन दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीदेखील साक्षी महाराज यांनी केली आहे. दरम्यान, साक्षी महाराजांचा या उद्घाटन सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.