नवी दिल्ली-
दिल्लीत आज राज्यसभेत आदिवासी मंत्रालयाशी संबंधित एका विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजपाच्या एका महिला खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट भगवान श्रीकृष्णशी केली आहे. मोदी देखील आजच्या युगातील कृष्ण भगवान असून तेही १६ कलांनी संपन्न व्यक्ती आहेत, असं खासदारानं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दोनवेळा खासदाराला केवळ विधेयकावर बोलण्याचा सल्ला दिला. फक्त विधेयकावर चर्चा करावी आणि आपलं भाषण संपवावं अशी सूचना उपसभापतींनी केली.
राज्यघटना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक, 2022 यावरील चर्चेत बोलताना राज्यसभेत भाजपाच्या खासदार संपतिया उईके यांनी मोदींची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली. "देशात असे अनेक पंतप्रधान झाले ज्यांनी देशाच्या कल्याणासाठी काम केलं पण ते फक्त भारतापुरतेच मर्यादित राहिले. परंतु पंतप्रधान मोदी यांच्याकडे अप्रतिम इच्छाशक्ती आणि राष्ट्र व जगाच्या कल्याणाची भावना आहे. ते आपलं वैयक्तिक स्वार्थ मागे टाकून देश आणि जगासाठी काम करत आहेत. त्यामुळेच त्यांना आज जागतिक नेता म्हणून संबोधलं जात आहे", असं त्या म्हणाल्या.
"अमेरिका असो, रशिया असो किंवा मग शेजारील देश पाकिस्तान असो. आज पीएम मोदींची सर्वजण मुक्तकंठानं स्तुती करतात. मोदी सध्याच्या युगातील कृष्ण भगवान आहेत. त्यांच्याकडेही १६ कला आहेत", असं विधान संपतिया उईके यांनी केलं. त्या इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास’ या आवाहनाची तुलना प्राचीन भारतीय सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी केली. "चंद्रगुप्त मौर्य यांनी अखंड भारत निर्माण केला होता, तेच काम पंतप्रधान मोदी करत आहेत", असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर उपसभापती हरिवंश यांनी संपतिया यांना विधेयकावर बोलण्याचा सल्ला दिला. "विधेयक झारखंडबाबत आहे, त्यावरच भाजप सदस्यांनी बोलावं", असं त्यांनी सांगितलं.
उपसभापतींच्या सूचनेनंतरही संपतिया यांनी मोदींचं कौतुक करणं सुरुच ठेवलं अखेर हरिवंश यांनी त्यांना अडवत कठोर सुचना केली. "तुम्ही दुसऱ्याच विषयावर बोलत आहात. तुम्ही विधेयकाच्या विषयावर बोलायला हवं. विधेयकापुरतं बोलून तुम्ही तुमचं भाषण संपवा", असं हरिवंश म्हणाले.