ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - व्यापम प्रकरण, वसुंधरा राजे, पंकजा मुंडे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे देशभरात भाजपाची मान शरमेने खाली गेली आहे अशा शब्दात भाजपा खासदार शांताकुमार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
हिमाचल प्रदेशमधून निवडून येणारे ८० वर्षीय खासदार शांता कुमार यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी हे पत्र पाठवले असून यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे भाजपाची नाचक्की झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शांताकुमार म्हणतात, मोदी सरकारचा पहिल्या वर्षाचा कार्यकाळ चांगला होता, आपण सर्वजण आंनदोत्सवात असताना राजस्थानपासून ते महाराष्ट्रपर्यंत भाजपा नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर पडू लागली. यात त्यांनी भाजपाच्या नेत्यांचे थेट नाव घेतलेले नाही. पण त्यांचा टीकेचा रोख वसुंधरा राजे व पंकजा मुंडे यांच्याकडे होता. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पक्ष व पक्ष कार्यकर्त्यांची मान शरमेने खाली गेली अशी खंतही शांताकुमार यांनी व्यक्त केली.
भाजपाने लोकपालच्या धर्तीवर एक समिती नेमून नेत्यांवर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु करावी अशी सूचनाही त्यांनी केली.