कोलकाता: विरोधकांच्या महारॅलीला संबोधित करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा आहे, असा डायलॉग मारत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयांवर तोंडसुख घेतलं. विरोधकांची एकी शानदार असल्याचं म्हणत त्यांनी महाआघाडीतील अनेकांचं तोंडभरुन कौतुक केलं. चौकीदार ही चोर है, या विरोधकांच्या मोदींवरील टीकेवर सिन्हा यांनी भाष्य केलं. जोपर्यंत पंतप्रधान यावर बोलणार नाहीत, तोपर्यंत चौकीदार चोर है ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, असं सिन्हा म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय पक्षाचा नव्हता. हा निर्णय मनमानीपणाचा नमुना होता. तो निर्णय पक्षाचा असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना याची कल्पना असती. रातोरात हा निर्णय घेण्यात आला. देशवासीयांना रांगेत उभं करण्यात आलं. आपल्या माता-भगिनींनी चांगल्या हेतूनं ज्या पैशांची बचत केली, तेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांना रांगा लावल्या लागल्या', अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली.
...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 4:15 PM