रायबरेली: उत्तर प्रदेशात गलितगात्र झालेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागा जिंकत भारतीय जनता पक्षानं राज्याची सत्ता मिळवली. त्यानंतर झालेल्या २०१९ मृच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीत पराभव पत्कारावा लागला. २०१४ मध्ये राहुल यांच्याकडून पराभूत झालेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी २०१९ मध्ये राहुल यांना अमेठीत धक्का दिला. यानंतर आता त्यांनी सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत चमक दाखवायला सुरुवात केली आहे.
सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत स्मृती इराणी सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच आता त्यांना रायबरेलीतील दिशा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. याआधी सोनिया गांधी दिशाच्या अध्यक्षा होत्या. मात्र आता त्यांच्याकडे सहअध्यक्षपद देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दिशा समितीची स्थापना होते. केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचं काम दिशा समिती करते. ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अध्यक्ष आणि सहअध्यक्ष यांची मतं विचारात घेऊन दिशा समितीची स्थापना होते.
दिशा समितीत सर्व आमदार, ब्लॉक प्रमुख आणि अन्य संसद सदस्यांचा समावेश असतो. २०१९ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सगळ्याच लोकसभा मतदारसंघांत (जिल्ह्यांमध्ये) दिशा समित्यांची स्थापना करण्यात आली. मात्र रायबरेलीत दिशाची स्थापना झाली नव्हती. आता दोन वर्षांनंतर त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत सोनिया गांधींना धक्का बसला आहे. दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून सोनिया गांधी हटवण्यात आलं आहे. त्यांची जागा स्मृती इराणींना देण्यात आली आहे. सोनिया गांधी समितीचा भाग असतील. मात्र त्यांच्याकडे सहअध्यक्षपदाची जबाबदारी असेल.