हैदराबाद - तेलंगणा येथील भाजपाचे खासदार सोयम बापूराव यांनी वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले आहेत. जर कोणी मुस्लीम युवक आदिवासी मुलींच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचे शिर कापून टाकलं जाईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. आदिलाबाद येथील खासदार सोयम बापूराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे त्यात ते असं विधान करताना दिसत आहेत.
व्हिडीओ क्लीपमध्ये खासदार सोयम बापूराव म्हणतात की, मी मुस्लीम युवकांनो सांगतो. जर तुम्ही आदिवासी मुलींच्या मागे लागलात तर तुमचा शिरच्छेद करु, मी माझ्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक युवकांना बजावून सांगतोय की आमच्या मुलींचा पाठलाग करु नका असं धमकीवजा इशारा खासदारांनी दिला आहे.
सोमवारपासून ही व्हिडीओ क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने भाजपा खासदार सोयम बापूराव चांगलेच अडचणीत आले आहेत. ज्यात त्यांनी मुस्लीम युवकांना जर आम्ही तुमचा पाठलाग केला तर तुम्हाला अडचणीचं जाईल असा इशारा दिला. या व्हिडीओवरुन अल्पसंख्याक समुदायाकडून भाजपा खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदारांच्या विधानामुळे मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा खासदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात आयपीसी कलम 506 आणि 294 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. अद्याप हा व्हिडीओ कधीचा आहे याची स्पष्टता झाली नाही. चौकशी केल्यानंतर दौषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.
भाजपा नेत्यांची अथवा खासदारांची वादग्रस्त विधाने नवीन नाहीत. निवडणुकीच्या प्रचारावेळीही भाजपा खासदारांनी वादग्रस्त विधाने केली होती. नुकताच भाजपाचे मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला यावर प्रतिकिया देताना प्रशांत किशोर आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का? असे विधान केले होते.