नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. केजरीवाल हे छुपे नक्षलवादी असल्याची टीका त्यांनी केली. ते रविवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्विग्नपणे म्हटले की, अरविंद केजरीवाल हे जन्मजात नक्षलवादी आहेत. इतर राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना पाठिंबा का देत आहेत, असा सवालही स्वामींना यावेळी विचारला. केजरीवाल यांनी राज्यपालांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी, कुमारस्वामी, पिनराई विजयन आणि चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तसेच केजरीवाल यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र नायब राज्यपालांनी परवानगी नाकारल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडताना देशात संवैधानिक संकट निर्माण झाल्याची टीका केली होती.
स्वामी भडकले; अरविंद केजरीवालांना म्हणाले नक्षलवादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:24 PM