नवी दिल्ली- महिलांच्या लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू झालेल्या #MeToo अभियानाला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. #MeToo अभियानाचा आधार घेत मनोरंजन आणि मीडियाजगतातील अनेक महिलांनी स्वतःला आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कथित स्वरूपात लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या महिलांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्या पुरुषांची नावे सार्वजनिक केल्यामुळे सोशल मीडियावरही धुमाकूळ माजला आहे. याच दरम्यान केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनीही महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. परंतु भाजपाचे खासदार उदित राज यांनी या प्रकरणावर बोजरी टिपण्णी केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, #MeToo अभियान गरजेचं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षांनंतर लैंगिक शोषणाचा आरोप लावलं कितपत योग्य आहे ?, इतक्या वर्षांनंतर या प्रकरणांची सत्यता कशी पडताळली जाणार आहे. ज्या व्यक्तीवर असे लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात येतात, त्यांची प्रतिमा मलिन होऊन त्यांना किती नुकसान होत असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. #MeTooच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडला जातोय.उत्तर पश्चिम दिल्लीतून खासदार असलेले उदित राज यांनी #MeToo अभियानावर टीका केली आहे. या अभियानाचा उपयोग इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातोय. हे कसं शक्य आहे की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलगी स्वतःच्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करेल आणि त्याच्यावर खटला दाखल होईल. अशा प्रकारची घटना गेल्या काही दिवसांपासून कोणा ना कोणाबरोबर तर घडतेच आहे. याचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातोय काय?, असं उदित राज म्हणाले आहेत.
#MeTooवर भाजपा खासदार म्हणे, महिला दोन-चार लाख घेऊन लावतात लैंगिक अत्याचाराचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 5:16 PM