कर्नाटकमधील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने मागच्या ४ दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. श्रीनिवास हे विविध आजारांचा सामना करत होते. दरम्यान २२ एप्रिल रोजी त्यांना बंगळुरूमधील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीनिवास यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज म्हैसूरमधील त्यांचं निवासस्थान असलेल्या जयलक्ष्मीपूरम येथे आणण्यात येणार आहे.
६ जुलै १९४७ रोजी जन्मलेल्या व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी कृष्णराज विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवत राजकारणात प्रवेस केला होता. व्ही. श्रीनिवास हे चामराजनगर येथून ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तर नंजनगुड येथून २ वेळ आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. श्रीनिवास यांनी हल्लीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली होती.
श्रीनिवास हे बालपणापासून १९७२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. तसेच जनसंघ आणि अभाविपमध्येही सक्रिय होते. व्ही. श्रीनिवास यांनी एकूण १४ वेळा निवडणूक लढवली. त्यामध्ये आठ वेळा ते विजयी झाले. १९८० मध्ये जनता पार्टीचे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेतील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१६ मध्ये सिद्धारामय्या यांच्या सरकारमधून हटवण्यात आल्यानंतर ते पुन्हा भाजपात आले होते. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.