नवी दिल्ली: यूपीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या निकालांना होणारा विलंब, परीक्षेपूर्वी होणारी पेपरफुटी यासारख्या प्रकरणांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावरुन आता पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारला घेरणाऱ्या वरुण गांधींनी यावेळी नोकरी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.
वरूण गांधी यांनी ट्विट केले की, 'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो. रेल्वे ग्रुप डीचे 1.25 कोटी तरुण दोन वर्षांपासून निकालाची वाट पाहत आहेत. लष्करातील भरतीबाबतही असेच आहे. भारतातील तरुणांनी कधीपर्यंत धीर धरायचा?' असा प्रश्न करत वरुण यांनी सरकारवर टीका केली आहे.
यूपीटीईटी परीक्षेवरुन राज्य सरकारवर निशाणाअलीकडेच उत्तर प्रदेशात यूपीटीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता. याबाबत वरुण गांधी यांनी ट्विट केले होते की, 'UPTET परीक्षेचा पेपर फुटल्याने लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ होत आहे. या दलदलीतील लहान माशांवर कारवाई करुन चालणार नाही, त्यांचा राजकीय पोशिंदा असलेल्या शिक्षण माफियांवर सरकारने कडक कारवाई करावी.'
'बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार? या प्रकरणी लहान लोकांना अटक करण्याऐवजी या लज्जास्पद खेळाचे खरे खेळाडू असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माफियांवर कारवाई व्हायला हवी', अशी मागणी त्यांनी केली होती.