अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:48 PM2021-10-14T15:48:17+5:302021-10-14T15:48:51+5:30
व्हिडिओमध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधी सरकारला म्हणतात-"सरकारने शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन कायद्याचा गैरवापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही."
नवी दिल्ली:भाजप खासदार वरुण गांधी(Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाविरोधात आवाज उठवला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जुन्या व्हिडिओद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देताना भाजपला सल्ला दिला. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 1980 च्या भाषणाची एक छोटीशी क्लिप ट्विटरवर पोस्ट केली, ज्यात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारला शेतकऱ्यांवर अत्याचार करण्याविरुद्ध इशारा दिला होता.
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने भाजपचे खासदार वरुण गांधी अनेकदा बोलले आहेत. यामुळे त्यांना पक्षाच्या रोषाचाही सामना करावा लागला. भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांचा समावेश करण्यात आला नाही.
Wise words from a big-hearted leader… pic.twitter.com/xlRtznjFAx
— Varun Gandhi (@varungandhi80) October 14, 2021
व्हिडिओमध्ये काय ?
वरुण गांधी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा 1980चा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, "जर सरकारने कायद्याचा गैरवापर केला आणि शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शेतकऱ्यांच्या संघर्षात सामील होण्यास आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही." भाजप खासदार वरुण गांधी यांनी यापूर्वीच उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.