भाजप नेते वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार? 'स्वागता'चे पोस्टर तयार; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:09 PM2021-10-12T17:09:53+5:302021-10-12T17:12:33+5:30
भाजप नेते वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्यानं स्वपक्षावर आणि सरकारवर टीकेचे बाण सोडत आहेत. सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलन असो वा लखीमपूरमधील हिंसाचार, वरुण यांनी भाजप सरकारलाच लक्ष्य केलं. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावले आहेत. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्टर्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. 'दु:ख भरे दिन बीते रे भै.ा अब सुख आयो रे,' असा मजकूर या पोस्टर्सवर आहे. यामध्ये वरुण गांधी यांच्यासोबतच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींचादेखील फोटो आहे. त्याखाली इरशाद उल्ला आणि बाबा अभय अवस्थी यांचे फोटो आहेत. दोघांच्या नावाखाली काँग्रेसचे वरिष्ठ नेते असा उल्लेख आहे.
वरुण गांधींच्या शेतकरी आंदोलन, लखीमपूर खेरीतील हिंसाचाराबद्दल घेतलेली भूमिका पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. लखीमपूर हिंसाचाराची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्य यांना पत्र दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला होता. याआधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी योगींना पत्र लिहिलं आहे.
लखीमपूर हिंसाचारबद्दल संताप व्यक्त करणारे वरुण गांधी भाजप नेतृत्त्वापासून दूर जात असल्याची चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात वरुण आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आलेलं नाही. यावर वरुण यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र शेतकऱ्यांच्या समर्थनात ते सातत्यानं ट्विट करत आहेत.