'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 10:21 AM2019-12-27T10:21:47+5:302019-12-27T10:23:23+5:30
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाची तारीख बदलण्याची विनंती तिवारी यांनी मोदींकडे केली आहे.
तिवारी यांच्या यांच्यानुसार बालदिन 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा. 26 डिसेंबररोजी बालदिन साजरा करून शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, असा तर्क तिवारी यांचा आहे.
देशात अनेक लहान मुलांनी बलिदान दिले आहे. मात्र साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग (गुरुगोविंद सिंग यांचे दोन मुलं) यांचे बलिदान सर्वोच्च आहे. 1705 मध्ये या दोघांनी सरहिंद येथे धर्माची रक्षा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोघांच्या बलिदान दिनी बालदिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती तिवारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे इतर मुलांना प्रेरणा मिळेल, असंही त्यांचं म्हणणे आहे.
दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.