नवी दिल्ली - झारखंड येथील रॅलीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महिला बलात्काराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया असं विधान त्यांनी केलं होतं. यावरुन लोकसभेत आज भाजपा खासदारांनी राहुल गांधींच्या विधानावरुन मोठा गदारोळ सुरु केला.
याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला, एका पक्षाच्या नेता रेप इन इंडिया असं बोलतो, देशातील महिलांचा बलात्कार करायला या असं विधान देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केलं असेल. महिलांचा अपमान सहन करणार नाही. गांधी कुटुंबातील व्यक्तीने असं विधान करुन देशातील महिलांचा अपमान केला. हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे असं सांगितले.
लोकसभेत शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या विधानाला आक्षेप घेत मुद्दा उचलला त्यानंतर भाजपाच्या महिला खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत मोठा गोंधळ निर्माण केला. जे बलात्कारी आहेत त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा होते पण बलात्काराचं राजकारण करुन अशाप्रकारे वक्तव्य करणं अतिशय निंदणीय आहे. अशी व्यक्ती संसदेच्या सभागृहात आहे जे रेप इन इंडिया बोलून देशातील महिलांवर बलात्कार व्हावा यासाठी प्रोत्साहन देतात, या विधानामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्मृती इराणी यांनी लोकसभेत केली. सभागृहात या मुद्द्यावरुन गोंधळ झाल्याने सभागृह १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
मागील शुक्रवारीही महिला मुद्द्यावरुन लोकसभेत गोंधळ झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जातंय तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नाव आणि हैदराबाद बलात्काराच्या घटनेवर त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उचलला होता. तर काँग्रेसने महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असं त्यांनी सांगितलं होतं.