नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराकडे पुन्हा कसून चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे सुशांतचे वैद्यकीय अहवाल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून पडताळणी केली जाणार आहे. आता, भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाबाबत स्वामींना संशय व्यक्त करत, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून सुशांत प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्यात सर्व प्रथमदर्शनी साक्षीदाराचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, घरातील नोकर नीरज सिंग, दीपक सावंत यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टराचा पुन्हा सोमवारी जबाब नोंदविण्यात आला. पोस्टमॉर्टेम लवकर करून देण्याबाबत मुंबई पोलिसांनी कोणत्या सूचना केल्या होत्या, पोस्टमॉर्टेम करताना कोणती खबरदारी घेतली, कोविड-19 रिपोर्ट चाचणी घेतली का?, याबाबत डॉक्टराकडून सखोल माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टेम करताना त्याच्या व्हिडीओ शुटिंग, वैद्यकीय अहवालाच्या प्रती पथकासमवेत असलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्टने ताब्यात घेतल्या, त्या पुन्हा तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या बोर्डाकडे पाठविण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर, आता सुब्रमण्यम स्वामींनी पोस्टमार्टेवर संशय व्यक्त केला आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी ट्विट करुन सुशांतच्या शवविच्छेदनसाठी हेतूपरस्पर विलंब केल्याचे म्हटले आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणातील मारेकऱ्यांची अघोरी मानसिकता आणि त्यांची वृत्ती हळहळू समोर येत आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाला जाणीपूर्वक उशीर केला गेला, त्यामुळे त्याच्या पोटातील विष द्रव्य पदार्थाप्रमाणे विरघळत गेल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. आता, याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज असल्याचं स्वामींनी म्हटलंय. स्वामींच्या या खळबळजनक ट्विटमुळे सुशांतप्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. सुशांतच्या मृत्युप्रकरणात स्वामींना सातत्याने लक्ष घातल्याचं दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दुबईच्या ड्रग डिलर आणि सुशांतच्या भेटीसंदर्भात ट्विट केले होते.
दरम्यान, यापूर्वीच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतची हत्याच झाली असावी, असा संशय व्यक्त केला होता.‘मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे,’ असे ट्विट करत सोबत कागदपत्रदेखील शेअर केले होते. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी अशा काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे, जे सुशांतच्या हत्येकडे इशारा करते. स्वामींनी एकूण 26 बाबी अधोरेखित केल्या. त्यापैकी केवळ दोन बिंदू आत्महत्या दर्शवतात. तर उर्वरित 24 बिंदूंवर नजर टाकली तर त्यातून सुशांतची हत्या झाल्याची शक्यता बळावत असल्याचे दिसून आले. तसेच, सुशांतच्या मृत्युची सीबीआय तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
आर्थिक बाबींची पडताळणी सुरु
सीबीआयने सुशांत सिहची बँक खाती, ठेवी, आर्थिक व्यवहार आणि आयटीआरसंबधी कागदपत्रे मुंबई पोलीस व ईडीकडून मागवून घेतली आहेत. त्याचबरोबर त्याच्या सीएला चौकशीसाठी समन्स पाठविले असून मंगळवारी त्याची, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्याकडे चोकशी केली जाणार असल्याचे समजते.
सीबीआयकडून सुशांत सिंह मृत्यूसंबधी सर्व संबधितांचे जबाब, चौकशी आणि पंचनामे करण्यात येत आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबाकडे तपास वळविला जाईल. त्यांना चौकशीसाठी पथक उतरलेल्या डीआरओच्या गेस्ट हाऊसमध्ये पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रिया किंवा तिच्या कुटूंबियांना चौकशीसाठी सीबीआयकडून कोणतेही समन्स बजाविण्यात आलेले नाही, असे तिच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.