नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (13 जुलै) संसद परिसरात भाजपाचं स्वच्छता अभियान पाहायला मिळालं. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह भाजपाच्या दिग्गज मंत्र्यानी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भाजपाचे मंत्री आणि खासदार या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं 150 वं वर्ष आहे. त्यामुळे संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हेमा मालिनी आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हातात झाडू घेऊन संसद परिसर स्वच्छ केला.
'स्वच्छ भारत अभियानां'तर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. हेमा मालिनी यांनी 'हे अत्यंत कौतुकास्पद पाऊल आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्याचा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मांडला. त्यामुळे आम्ही ही बाब कृतीत आणली आणि हा परिसर स्वच्छ केला. पुढील आठवड्यात मी मथुरा येथे जाणार आहे तिथेही अशाच रितीने स्वच्छता मोहीम राबवली जाईल' असं म्हटलं आहे.
भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे पार पडली होती. या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासमेवत अनेक दिग्गज नेते हजर होते. या बैठकीत भाजपाच्या सर्व खासदारांना 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या पदयात्रेला सुरुवात होणार असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अठरा अठरा तास काम करतात. तसेच, आपल्या सहकारी मंत्र्यांनाही नेहमीच कामात सक्रीय असण्याचे धडे देतात. यापूर्वीही मोदींनी सर्व मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर, आता मोदींनी भाजपाच्या सर्वच खासदारांना पदयात्रा काढण्याची सूचना केली आहे. दिल्लीतील भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी ही सूचना केली. विशेष म्हणजे एकूण 150 किलो मीटरची ही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेत खासदार, आमदार, भाजपा नेते आणि कार्यकर्ते हजर असतील. दररोज 15 किमी म्हणजेच 10 दिवसात 150 किमींची पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेतून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक बुथवर वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. लोकसभेसह राज्यसभेच्या खासदारांनाही ही पदयात्रा करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली होती.