नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. "काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. तर भाजपा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे" असं राहुल गांधी म्हणाले. तसेच चीन बाबत बोलतानाही राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता भाजपाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी (BJP Mukhtar Abbas Naqvi) यांनी हल्लाबोल करत पलटवार केला आहे.
"काँग्रेसचे अस्तित्व व्हेंटिलेटरवर आणि नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर" असं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस नेते परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. "काँग्रेसच्या या विकार धारेने एकेकाळी देशाचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या पक्षाची अशी अवस्था केली आहे की तो आता परिसरातही नाही. आज काँग्रेसचं अस्तित्व व्हेंटिलेटरवर आहे, तर त्यांच्या नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर आहे. काँग्रेस नेते परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. भारताची तुलना पाकिस्तान, श्रीलंका किंवा इतर कोणत्याही देशाशी करतात" असं मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
“पूर्वीसारखा भारत परत मिळवण्यासाठी आमचा पक्ष लढत आहे. परंतु भाजपाकडून लोकांचा आवाज दाबला जातो. आम्ही लोकांचा आवाज ऐकण्यासाठी काम करत आहोत,” असं राहुल गांधी म्हणाले होते. ज्यांनी देशाच्या निर्मितीचं काम केलं, त्या संस्थांवर हल्ले होत आहेत, त्यावर डीप स्टेटचा कब्जा असल्याचंही ते म्हणाले होते. “काँग्रेसची ही लढाई आता वैचारिक लढाई आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघाला भारत एक भूगोलाप्रमाणे दिसत आहे. परंतु काँग्रेससाठी भारत हा लोकांनी बनतो,” असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसला अंतर्गत कलह, पक्ष बदल आणि निवडणूकांमध्ये पराभव अशा गोष्टांना सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी मान्य केलं.
“भाजपा सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे ते सत्तेत राहिलेत. आज भारतात परिस्थिती चांगली नाही. भाजपाने चहुबाजूंना रॉकेल शिंपडले आहे,” असंही राहुल गांधी म्हणाले होते. आमच्याकडे एक असा भारत आहे, जेथे निरनिराळे विचार मांडता येतील आणि आपण चर्चाही करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. “प्रत्येक संस्थांवर सरकारचा कब्जा झाला आह. प्रत्येक संस्थांवर हल्ला केला जात आहे. आमच्याकडे भाजपासारखा उमेदवार आहे असं लोक म्हणतात. जर आपण भाजपासारखा उमेदवार आहे असं म्हटलं तर आपण भाजपाच होऊ. भाजपा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वांचा आवाज ऐकतो. आम्ही लोकांना ऐकण्यासाठी आहोत,” असं लोकशाही विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते.