नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पार्टीचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुरुवारी प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावरुन मायावती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हल्लाबोल केला. यावेळी मोदी सरकार प्रशासनाचा गैरवापर करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला.
मायावती यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या," जे भाजपाचे नेते स्वत:ला इमानदार म्हणत असतील तर त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. कारण, राजकारणात येण्याआधी त्यांचाकडे किती संपत्ती होती आणि आता किती संपत्ती आहे?" याचबरोबर, वंचित पुढे गेले की त्यांना त्रास होतो. स्वत:ला हरिशचंद्र मानणाऱ्या भाजपाने सांगावे की निवडणुकीदरम्यान त्यांच्याजवळ दोन हजार कोटी रुपये कोठून आले, ही बेनामी संपत्ती नाही का? असा सवाल मायावती यांनी केला. याशिवाय मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली.
दरम्यान, मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीचा तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जात होता. नोएडामध्ये आनंद कुमार यांची बेनामी जमीन असल्याचं तपासातून समोर आलं. सात एकरवर पसरलेल्या या जमिनीचं मूल्य ४०० कोटींच्या घरात आहे. आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या मालकीची बेनामी जमीन जप्त करण्याचे आदेश १६ जुलैला दिल्लीतील बेनामी संपत्ती विरोधी विभागानं दिले होते. यानंतर आज प्राप्तिकर विभागानं जप्तीची कारवाई केली.
(बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच)