देशात 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने आपली नजर दक्षिण भारतातील राज्यांकडे वळवली आहे. येथे भाजप आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आता भाजपने कर्नाटकनंतर तेलंगणावर लक्ष केंद्रित केले आहे. याच उद्देशाने त्यांनी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये ठेवली आहे. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) चंद्रशेखर राव आणि AIMIM चे असदुद्दीन ओवेसी यांना घेरण्याचा प्रयत्न करेल.
तेलंगानामध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नात भाजप -बाय बाय केसीआर, हे ध्येय वाक्य घेऊन तब्बल 18 वर्षांनंतर हैदराबादमध्ये भाजपची ही बैठक होत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील सहभागी होणार आहेत. यावेळी, वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीतील भाजपच्या योगदानासंदर्भातही, या कार्यकारिणी बैठकीतून संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. याशिवाय, वेगळ्या तेलंगणा राज्याच्या आंदोलनातील भाजपच्या समर्थनाचा आणि सुषमा स्वराज यांच्या संसदेतील ऐतिहासिक भाषणाचाही उल्लेख करेल.
जनसंपर्कासाठी पक्षाच्या नेत्यांची ड्यूटी- केसीआर हे साधारणपणे 522 दिवसांसाठीच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर सत्तापरिवर्तन होईल आणि भाजप स्वबळावर राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करेल, अशी घोषणा भाजपने केली आहे. यासाठी भाजपने तयारीही सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वीच, भाजपने तेलंगणातील 119 विधानसभा मतदार संघांत, कार्यकारी समितीच्या 119 वरिष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांची 48 तासांसाठी ड्युटी लावली आहे. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदींची उद्या रॅली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील प्रसिद्ध परेड ग्राऊंडवर दुपारी ४ वाजताच्या सुमारास जनसभेला संबोधित करतील. या रॅलीसाठी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे सर्व मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. रॅली यशस्वी करण्यासाठी 33 हजार बूथ समन्वयकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.