अलाहाबाद : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक रविवारपासून येथे सुरू होत आहे. त्या अनुषंगाने शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य सहभागी होणार आहेत.पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला विशेष संरक्षण समूह (एसपीजी) गुरुवारीच येथे डेरेदाखल झाला असून, त्याने कायस्थ शाळेच्या पटांगणाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. याच ठिकाणी उभारलेल्या विशाल आणि वातानुकूलित शामियानात ही बैठक होणार आहे. या निमित्त पवित्र संगमाजवळ परेड ग्राउंडलगत सोमवारी जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. एसपीजीकडून स्थानिक सर्किट हाउसच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात येत आहे. १२ आणि १३ जूनच्या रात्री मोदींचा मुक्काम सर्किट हाउसवर असणार आहे.उत्तर प्रदेश पोलीस विभागाने २० जिल्ह्यातील जवान सुरक्षेत तैनात केले आहेत. अलाहाबादचे पोलीस महानिरीक्षक आर. के. चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक स्तरावरील १८ अधिकारी, ३० अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ५० सर्कल आॅफिसर, २५०० कॉन्स्टेबल आणि राज्य सशस्त्र दलाचे १८०० जवानांना शहराची सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या कामी लावण्यात आले आहे. यासोबतच बॉम्ब निष्क्रिय करणारे पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार सहभागी होणार असून राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डावपेच यावेळी ठरविले जाऊ शकतात. शहरात गुरुवारपासूनच डेरेदाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंग यांनी सांगितले की, अलाहाबाद हे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते व्ही. पी. सिंगसारख्या दिग्गज नेत्यांनी याच शहरातून राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे येथे पक्षाची बैठक आयोजित करण्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात बदल आणण्याचा आमच्या प्रयत्नांना निश्चित बळ मिळेल.
आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
By admin | Published: June 12, 2016 3:47 AM