BJP National Council meet (Marathi News)नवी दिल्ली : देशात आतापासून आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. यादरम्यान भाजपाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मंत्रही देतील. तसेच, या अधिवेशनात दोन प्रस्तावही मांडले जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. लोकसभा निवडणूक-2024 मध्ये भाजपाने 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून सुरू होणार असून रविवारपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात प्रामुख्याने लोकसभा निवडणूक-2024 च्या रणनीतीवर विचारमंथन होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर मुद्द्यांवर चर्चेसोबतच मोदी सरकारच्या कार्यकाळातील कामगिरीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस चालणार आहे.
दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय बैठकीत दोन प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. पहिला राम मंदिर आणि दुसरा प्रस्ताव विकसित भारत : मोदींची गॅरंटीवर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक सभांमध्ये या गॅरंटीचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे अयोध्येत राम मंदिराचे औपचारिक उद्घाटन झाले आहे. जानेवारी महिन्यात एका भव्य कार्यक्रमात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रभू रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
अधिवेशनापूर्वी पदाधिकाऱ्यांची बैठकभाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रवक्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. तसेच, नरेंद्र मोदी प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपममध्ये जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षांचा विकास प्रवास दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे, तर भाजपासाठी ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे.