JP Nadda: “देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवाय”; जेपी नड्डांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:15 PM2022-04-18T13:15:35+5:302022-04-18T13:16:56+5:30
JP Nadda: देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा? अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे.
नवी दिल्ली: रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान काही हिंसक घटना घडल्या. यावरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करत देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी (PM Modi) गप्प का, असा गंभीर सवाल करत घणाघाती टीका केली. याला आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी प्रत्युत्तर दिले असून, देशातील जनतेच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस काळातील दंगलींची यादीच देत देशातील तरुणांना विनाश नाही, विकास हवा आहे. विरोधकांनी आतापर्यंत भेदभाव आणि व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप करत, नड्डा यांनी विरोधकांनी आता विकासाचे राजकारण करावे, असा सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संसदीय निवडणुकीत पराभूत केले होते, याची आठवणही जेपी नड्डा यांनी देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हाचा भारत कसा हवा?
जेपी नड्डा यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या दंगलींची यादीच दिली आहे. तसेच देशात काँग्रेसच्या कार्यकाळातच भीषण नरसंहार झाले, असा दावा नड्डा यांनी केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा २०४७ मध्ये शंभर वर्षे होतील, तेव्हाचा भारत देशवासीयांना कसा हवा आहे, असा सवालही नड्डा यांनी केला आहे. आताच्या घडीला सर्व धर्मांतील, सर्व वयोगटातील युवापिढी सर्व क्षेत्रातील जनतेसह गरिबी हटवणे आणि भारताने नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नड्डा यांनी नमूद केले.
दरम्यान, देशातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या असून चिथावणीखोर वक्तव्यांनी स्थिती आणखी बिघडवली जात आहे. त्यावर देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी , झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव , भाकपचे सरचिटणीस डी. राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी. के. कुन्हालीकुट्टी या १३ नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे.