नवी दिल्ली - देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात 'लेटर'वॉर सुरू झालं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले. त्यानंतर राहुल गांधींच्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून प्रश्नांचा भडीमार केला. आता खरगे यांच्या पत्रावर भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर देत पत्र पाठवलं आहे.
नड्डा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला. तितकेच नाही तर सोनिया गांधी यांनी मोदींसाठी मौत का सौदागर या शब्दाचा वापर केला. काँग्रेस नेत्यांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोदींना ११० हून अधिक शिव्या दिल्या. ज्या व्यक्तिचा इतिहास देशातील पंतप्रधानांसह पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून संबोधण्याचा आहे, पंतप्रधानांसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याचा आहे, ज्याने संसदेत पंतप्रधानांना काठीने मारण्याची भाषा केली त्यांच्या मानसिकतेबाबत देशाला माहिती आहे अशा राहुल गांधींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या मजबुरीतून करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच काँग्रेस कॉपी अँन्ड पेस्टवाला पक्ष बनला आहे. मागील १० वर्षात पंतप्रधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी शिव्यांचा वापर केला. दुर्दैव म्हणजे त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही समावेश होता. मग त्यावेळी राजकीय संस्कृती, मर्यादा, शिस्त, शिष्टाचार यासारख्या शब्दांचा तुमच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशातून गायब होता का? असा सवाल करत जे.पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान याचा उल्लेख केला. स्वार्थी सत्तेत बुडालेली काँग्रेस पार्टी कथित मोहब्बत की दुकान असं जे प्रोडेक्ट विकत आहे, जातीयवादी विष पेरत आहे. वैमनस्या वाढवत आहे. देश तोडण्याचं काम करतेय असा आरोपही केला.
काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते. त्यात केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टूसह इतर नेत्यांविरोधात ज्यांनी राहुल गांधींवर टीका केली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह आणि हिंसक विधाने केली. भाजपा नेत्यांच्या या विधानावर काँग्रेसनं चिंता व्यक्त केली होती. भविष्यासाठी हे घातक आहे असं खरगे म्हणाले.