नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकरने अकाउंट हॅक केल्यानंतर सॉरी, असेही लिहिले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर, त्यांच्या ट्विटर हँडलवरून, ''सॉरी माझे अकाउंट हॅक झाले आहे. येथे रशियाला दान करण्यासाठी कारण त्यांना मदतीची आवश्यकता आहे,'' अशी पोस्ट करण्यात आली आहे.
मात्र, आता त्याचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर झाले आहे. यासंदर्भात बोलताना जेपी नड्डा म्हणाले, अकाउंट हॅक होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आपण ट्विटरशी बोलत आहोत, तत्पूर्वी जेपी नड्डा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक ट्विट केले होते.
सकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या ट्विटमध्ये जेपी नड्डा यांनी म्हटले होते, की - ''आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सर्व 61 जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी आपले मतदान अवश्य करावे आणि राज्यात मजबूत सरकार बनवण्यात आपली भूमिका पारपाडावी. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आग्रह आहे, की त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावे."
पाचव्या टप्प्यातील मतदानात ज्या मोठ्या चेहऱ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे त्यांत यूपी सरकारचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, योगी सरकारचे मंत्री मोती सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, सिद्धार्थनाथ सिंह, रमापती शास्त्री, चंद्रिका प्रसाद उपाध्याय यांचा समावेश आहे. तसेच, काँग्रेसच्या आराधना मिश्रा मोना आणि जनसत्ता दलाचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैय्या यांच्यासह, अपना दल अध्यक्ष कृष्णा पटेल यांच्या भवितव्याचाही फैसला याच टप्प्यात होणार आहे.