NCP Sharad Pawar Resign: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष तसेच भाजप व शिंदे गट यांच्याकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरही शरद पवार यांच्या निवृत्तीची दखल घेतल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. त्याचाच हा परिणाम आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आहे. शरद पवार आपली सत्ता गमावत असून ते ज्या पद्धतीने सत्तेच्या जोरावर चालत होते, ती सत्ता आता धोक्यात आली आहे, असा दावा दिलीप घोष यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने ज्या आधारावर मतदान केले होते, त्यावरून राजकारण केले जात आहे, असा आरोप दिलीप घोष यांनी केला. दुसरीकडे, भाजपचे राज्यातील नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राष्ट्रवादीवर टीका केली आहे. जे पद अस्तित्वातच नाही त्याचा राजीनामा दिला म्हणजे काय असे वेगळे केले, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथम यावर भाष्य केले. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"