नवी दिल्ली : विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अस्वस्थता असून, आघाडी मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने सहिष्णू व सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.रालोआतून तेलगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर पडली आहे. तर, शिवसेना द्विधा मन: स्थितीत असते. बिहारमधील जातीय हिंसाचारानंतर जनता दल (यू) लाही काळजी वाटू लागली आहे. जेडीयूचे नेते के.सी. त्यागी म्हणाले की, बिहारमध्ये कोणतेही संकट नाही. मात्र, आघाडीत समन्वय असायला हवा.ते म्हणाले की, एनडीए १ व एनडीए २ मध्ये खूप फरक आहे. नेतृत्वात बदल झालेला आहे. पण, सहकारी पक्षांसोबत समन्वयासाठी बैठका घेतल्या जाव्यात आणि मतभेद दूर करण्याची गरज आहे. केंद्रात जेडीयूचे प्रतिनिधित्व नाही. हा मुद्दा सोडविण्याची गरज आहे.उत्तर प्रदेशातील मंत्री आणि भारतीय समाज पार्टीचे नेते ओ.पी. राजभर यांनीही समन्वय नसल्यामुळे मतभेद होत असल्याचे मान्य केले. सर्व पक्षांनी एकत्र बसून मुद्दे सोडविण्याची गरज आहे. त्यासाठी रालोआच्या नियमित बैठका व्हायला हव्यात.बिहारमध्ये अन्यही अस्वस्थएनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह हेही सरकारवर नाराज आहेत. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये त्यांनी नुकतीच लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. कुशवाह यांनी पाटण्यात अलीकडेच जेडीयू- भाजप आघाडी सरकारविरुद्ध आंदोलनही केले होते. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान हेही भाजपाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाने समावेशक होणे आवश्यक- मित्रपक्षांचा सल्ला; टीडीपी बाहेर, सेना संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 5:34 AM