- हरिश गुप्तानवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे नेते व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून, बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्या-खासदारांशी त्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंध्र प्रदेशला सढळ हाताने मदत केल्याचा केंद्राचा दावा खोडून काढण्यासाठी त्यांनी आंध्र भवनात नेते आणि पत्रकारांना निमंत्रित केले आहे.चंद्राबाबू नायडू म्हणाले की, अमरावतीमध्ये नव्या राजधानीच्या उभारणीसाठी एक पैसाही राज्याने खर्च केला नाही, हे केंद्राचे म्हणणे खोटे आहे. नव्या राज्याची निर्मितीनंतर केंद्राने निधी देण्याचा शब्द पाळला नाही. त्यावर मी चर्चेस तयार आहे, त्यासाठी सर्व दस्तऐवजही सादर करू. राज्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी केंद्र राजकारण खेळत असून, राज्य सरकारला अपमानित करीत आहे, असा आरोप करून चंद्राबाबू म्हणाले की, आंध्र्रला तारणाऱ्या मुख्यमंत्र्याऐवजी केंद्राला कमजोर मुख्यमंत्री हवाय. सहकारी पक्षांना भाजप सन्मान देत नाही. वायएसआर काँग्रेससारखे कमजोर पक्ष भाजपाला हवे असतात, ज्यांचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत आहेत. रायलसीमासारखे मुद्दे काढून भाजपा प्रादेशिक पक्षांना चिथावणी देतो.नायडू यांनी अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल व अकाली दलाचे नरेश गुजराल यांनाही भेटले द्रमुकच्या नेत्या कणिमोळी, अनुप्रिया पटेल (अपना दल) फारुक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), जितेंद्र रेड्डी (तेलंगणा राष्ट्र समिती) यांचीही भेट झाली. ‘लोकमत मीडिया ग्रुप’चे अध्यक्ष विजय दर्डा हेही नायडू यांना भेटले. त्यांनी राज्यातील विद्यमान परिस्थिती व राज्य व केंद्र यांच्या संबंधांवर त्यांच्याशी चर्चा केली.दिवसभर भेटीगाठीनायडू आपल्या दिल्लीभेटीत विरोधी पक्षनेत्यांना भेटून आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला हे समजावून सांगणार आहेत. नायडू आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तीन तास होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये खूपच गर्दी होती. तेथे नायडू नेते व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटले. नायडू यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
भाजपाला हवे आहेत कमकुवत सहकारी, चंद्राबाबू यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:48 AM