ईशान्येत भाजपाच! त्रिपुरात डाव्यांचा पराभव, दोन राज्यांत काँग्रेसला नाही एकही जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 06:14 AM2018-03-04T06:14:55+5:302018-03-04T06:14:55+5:30
गेली २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना त्रिपुरातून हुसकावून लावून, भाजपाने तिथे मुसंडी मारली आहे. तेथील ५९ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला असून, २0१३ साली ४९ जागा मिळविणा-या मार्क्सवाद्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळाला. ईशान्येच्या २ राज्यांतही भाजपाने चंचुप्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : गेली २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना त्रिपुरातून हुसकावून लावून, भाजपाने तिथे मुसंडी मारली आहे. तेथील ५९ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला असून, २0१३ साली ४९ जागा मिळविणाºया मार्क्सवाद्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळाला. ईशान्येच्या २ राज्यांतही भाजपाने चंचुप्रवेश केला आहे.
नागालँडमध्ये भाजपाप्रणीत आघाडी व एपीएफ या दोघांना जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, जनता दल (यु)चा एक आमदार व एका अपक्षाने भाजपाला समर्थन देण्याचे जाहीर केल्याने नागालॅँडमध्ये भाजपा आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. मेघालयामध्येही अनिश्चितच स्थिती आहे. तिथे काँग्रेसला २१, एनपीपीला १९ जागा मिळाल्या असून, भाजपाला २, यूडीपीला ८ आणि इतरांना ११ जागा मिळाल्या असून, त्यापैकी यूडीपी, तसेच इतर कोणाला पाठिंबा देतात, यावर तेथील सरकारचे बनणे अवलंबून आहे.
काँग्रेस दोन्हीकडे नाही
या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा त्रिपुरा व नागालँड या २ राज्यांत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. याउलट नागालँड व मेघालय या दोन्ही राज्यांत भाजपाने खातेही उघडले असून, तिथेही आम्ही ठरवू, तेच सरकार बनवू शकतील, असा पवित्रा घेतला आहे.
सर्वाधिक जागा मिळालेल्या
काँग्रेसला मेघालयात कोणत्याही स्थितीत सरकार बनवू द्यायचे नाही, असा पणच भाजपाने केला आहे. एनपीपीला मदत करतानाच, इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठीही भाजपा सर्वतोपरी साह्य करेल, असे चित्र आहे.
नेते शिलाँगकडे : मणिपूर व गोवा ही राज्ये हातात येण्याची शक्यता असताना काँग्रेस नेतृत्वाने हवी तितकी घाई न केल्याने गमावली होती. यंदा तसे होऊ नये, यासाठी मेघालयात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता दिसताच, काँग्रेसने अहमद पटेल व कमलनाथ या दोघांना सकाळीच शिलाँगला पाठविले. तिथे अन्यांची मदत घेण्यासाठी त्यांनी बोलणी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपानेही हिमांता बिस्वा सर्मा यांना शिलाँगला पाठविले आहे. सर्मा हे एके काळी काँग्रेसमध्येच होते आणि सध्या भाजपाच्या ‘नेडा’ (नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स-ईशान्य लोकशाही आघाडी)चे प्रमुख आहेत.
नागालँडमध्ये एनपीपीचे टी. आर. झेलियांग की एनडीपीपीचे नैफियू रिओ मुख्यमंत्री होणार हेही त्यांना किती अपक्ष पाठिंबा देतात, यावर ठरेल.
‘सरकार यांना त्रिपुरात स्थान नाही’
त्रिपुरातील डाव्यांच्या पराभवानंतर माणिक सरकार यांनी केरळ, पश्चिम बंगाल वा बांगलादेशात जावे, असा उपरोधिक टोला भाजपाचे ईशान्येकडील नेते हिमांता बिस्वा सर्मा यांनी लगावला. माणिक सरकार सलग २0 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री होते.
स्वबळावर १७ राज्ये
भाजपाने आतापर्यंत १६ राज्यांत स्वबळावर सत्ता मिळवली, तर काश्मीर, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, बिहार या राज्यांत मित्रपक्षांसोबत भाजपा सत्तेवर आहे. म्हणजेच तिथे रालोआचे सरकार आहे. आता त्रिपुरात सत्ता मिळाल्याने भाजपा १७ राज्यांत स्वबळावर असेल. नागालँड व मेघालयात सरकार स्थापन करण्यात भाजपा व मित्रपक्षांना यश आल्यास रालोआ सरकार असलेल्या राज्यांची संख्या वाढेल.
त्रिपुरात बिप्लब देब
त्रिपुरामध्ये बिप्लब देब हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे दिसत आहे. ते संघाचे कार्यकर्ते असून, ते व्यवसायाने जिम इन्स्ट्रक्टर होते.
मेघालयात एखादे संगमा
मेघालयात काँग्रेसचे मुकुल संगमा व एनपीपीचे कानरॅड संगमा यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होईल, हे नक्की. अर्थात, अपक्ष व इतर कोणाला पाठिंबा देणार, यावर हे अवलंबून आहे.
भाजपाचा दोन्ही राज्यांत दावा
मेघालयाबरोबरच नागालँडमध्ये २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात आमची आघाडी यशस्वी होईल, असा दावा भाजपा नेते करीत आहेत. त्रिपुरामध्ये स्वबळावर सत्ता आणि मेघालय व नागालँडमध्ये आपल्या मदतीने सरकार या पद्धतीने ईशान्य भारतातील राज्यांवर कब्जा करण्याचा भाजपाचा स्पष्ट प्रयत्न आहे.
नागालँडच्या पराभवाला सी. पी. जोशी जबाबदार
काँग्रेसच्या पराभवाला प्रभारी सी. पी. जोशी जबाबदार असून, त्यांनी नागालँडच नव्हे, तर ईशान्येच्या सर्वच राज्यांतून काँग्रेस पक्ष संपविला, असा आरोप नागालँड काँग्रेसच्या अध्यक्षांनी पराभवानंतर केला. त्यांनी राहुल गांधी यांना इथे येऊ ही दिले नाही, असे ते म्हणाले.