संतोष ठाकूर नवी दिल्ली : सतरा बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत, तसेच त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी अद्याप निर्णय घेतल्याने त्यांची भवितव्य अंधातरी लटकले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची भाजप घाई करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेतल्यानंतरच भाजप पुढची चाल करील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटकातील नाट्यावर पडदा पडण्याच वेळ लागेल. दुसरीकडे, बी.एस. येदियुरप्पा हेच मुख्यमंत्री असतील, असे मानले जात असले तरी एक गटाने त्यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे. तेव्हा पक्षांतर्गत मतभेद मिटविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.सूत्रांनुसार भाजपच नवनियुक्त संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष आणि येदियुरप्पा यांच्यात सख्य नाही. तेव्हा येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी या दोघांतील भांडण भाजपला मिटवावे लागेल. बी.एल. संतोष यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यास नजीकच्या भविष्यात संघटना आणि सरकारमध्ये दरी उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे दोघांत सलोख्या घडवून आणण्यासावर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे.
दक्षिणेकडील राज्यांत भाजपचा जम बसविण्यासाठी संतोष यांनी खूप मेहनत घेतली आहे. याचा विचार करूनच त्यांना अनेक वरिष्ठ पदांवर प्राधान्य देत संघटन सरचिटणीस करण्यात आले, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ते राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही होते.
केंद्रीय नेतृत्व आणि संघटनेची संयुक्त ताकद प्रकट करणारे कर्नाटकातील सरकार असावे, असा केंद्रीय नेतृत्वाचा मानस आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची घाई न करता अंतर्गत मतभेद भाजपने दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तथापि, पक्षातील अनेकांना वाटते की, वयाची सत्तरी ओलांडलेले येदियुरप्पा यांच्यासाठी ही अंतिम संधी आहे. त्यांनी कर्नाटकात पक्ष नावारूपाला आणला. तेव्हा त्यांना संधी दिली जावी. संतोष यांचीही नाराजी ओढवून घ्यायची नसल्याने वरिष्ठ पातळीवर दोघांची मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दोघांतील मतभेद २०१८ मध्ये पुढे आले होते.
केंद्रीय आदेशाच्या प्रतीक्षेतकर्नाटकात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत, असे कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी बंगळुरू येथे सांगितले.प्रदेश मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मी दिल्लीहून आदेश मिळण्याची वाट पाहत आहे. कोणत्याही वेळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राजभवनात जाऊ शकतो. पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी संघ परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.