नवी दिल्ली : आपण निष्पक्ष लढाई लढत आहेत, हे मनातून काढून टाका. कारण, भाजप व संघाने आपल्या देशाच्या प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे आपली लढाई ही केवळ त्यांच्याविरोधात नाही, तर ‘इंडियन स्टेट’विरोधात असल्याचे नमूद करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सत्ताधारी पक्षावर तोफ डागली.
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य देशद्रोहासमान आहे. त्यांच्या वक्तव्याने भारतीयाचा अवमान झाला आहे. दुसऱ्या देशात भागवतांनी असे वक्तव्य केले असते, तर त्यांना आतापर्यंत अटक झाली असती. संविधान अवैध आहे, इंग्रजांविरोधातील युद्ध अवैध आहे, हा भागवतांच्या वक्तव्याचा मतितार्थ होतो. अशी वक्तव्य करणे बंद झाले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत चुकीच्या गोष्टी घडल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीत पारदर्शकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तरे देत नाही. महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांत सुमारे एक कोटी नव्या मतदारांचा समावेश झाला. त्याबद्दल विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला आयोग उत्तर देत नाही असा आराेपही त्यांनी केला.