नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. भाजपा देशात दंगली भडकविण्याचा प्रयत्न करते, मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही. भाजपाने सबका साथ, सबका विश्वास असा नारा दिला पण प्रत्यक्षात सबका सर्वनाश केला अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात कोलकाताच्या हावडा मैदानात आयोजित केलेल्या रॅलीत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गृहमंत्री अमित शहांना त्यांचे काम समजलं पाहिजे, त्यांचे काम देशात तणाव निर्माण करणे नाही. जर सुधारित नागरिकत्व कायद्याला देशात विरोध होत असेल तर हा कायदा लागू होणारच अशी भाषा का वापरता? तुम्हाला पाहिजे तेवढे जेल बनवा, कॅम्प बनवा असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
तसेच जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं, अमित शहा हे फक्त भाजपा नेते नाहीत तर देशाचे गृहमंत्री आहेत हे तुमच्या लक्षात राहुद्या. तुम्ही सबका सर्वनाश केला आहे. शहा सांगतात आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही मग सगळ्या गोष्टी आधार कार्डशी लिंक का केल्या? असा सवाल ममता बॅनर्जींनी अमित शहांना केला आहे. दरम्यान, जे लोक दावा करत आहेत की, एनआरसी आणि सीएए हा कायदा देशातील नागरिकांना नाही पण त्यांना माहित असावं की, हे दोन्ही कायदे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा कायदा बंगालमध्ये लागू होणार नाही. या कायद्याविरोधात लोकांनी एकजूट व्हावं असं आवाहन ममता बॅनर्जींनी लोकांना केलं आहे.
त्याचसोबत तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या जनसभेला संबोधित करताना म्हणाल्या. ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.