बंगळुरु : जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच डी देवेगौडा यांनी आज मोठा खुलासा केला आहे. निवडणुकीपूर्वी जेडीएससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने मुख्यमंत्री कुमारस्वामींना मोठी लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुमारस्वामींनी ही ऑफर नाकारल्याचे सांगत त्यांनी मुंबई कनेक्शन असल्याचे सांगितले.
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात असून भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले होते. यानंतर कर्नाटकात मोठा हडकंप उडाला होता. मात्र, कुमारस्वामी सरकार स्थिर राहिले. या काळातल्या घडामोडींचा गौप्यस्फोट देवेगौडा यांनी केला आहे.
भाजपाने कुमारस्वामींना त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती. निवडणुकीपूर्वी मोठी रक्कम लाचेच्या स्वरुपात देण्यात येणार होती. यासाठी कुमारस्वामींना मुंबईतील पैसे ठेवलेल्या एका ठिकाणी बोलावण्यास आले होते. मात्र, कुमारस्वामींनी ही ऑफर नाकारल्याचे देवेगौडा यांनी सांगितले.