नवी दिल्ली - मध्य प्रदेशात काँग्रेस शासित राज्य सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाने हालचाली सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून घोडेबाजार केला जात आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपामुळे खळबळ माजली आहे.
दिल्ली पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटक आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही. शिवराज चौहान आणि नरोत्तम मिश्र यांच्यात एकमत झालेले आहे. एकाने मुख्यमंत्री आणि दुसऱ्याने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. शिवराज चौहान यांच्याकडून काँग्रेस आमदारांना फोन लावण्यात येत आहेत. एका आमदाराला २५ ते ३५ कोटी रुपये ऑफर दिली जात आहे. ५ कोटी आता घ्या, दुसऱ्या टप्पा राज्यसभा निवडणूक आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण रक्कम सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी देऊ असं सांगितलं जात आहे.
मात्र दिग्विजय सिंह यांच्या आरोपाला उत्तर देताना शिवराज चौहान म्हणाले की, खळबळजनक दावा करणं ही दिग्विजय सिंह यांची जुनी सवय आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे लक्ष विचलित करणे आणि स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्याकडून हे आरोप केले जात असावेत असा टोला त्यांनी दिग्विजय सिंह यांना लगावला.
यापूर्वी कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपाने धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप केला जात होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले. कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांमुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अल्पमतात गेले. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारविरोधात गेली आणि सरकार कोसळलं होतं.
तर महाराष्ट्रतही सत्तास्थापनेदरम्यान प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. भाजपाकडून आमदारांना फोडलं जात आहे, त्यांना अमिष दाखवण्यात येत आहेत असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे तो सिद्ध होतो का ते येणाऱ्या काळात ठरेल.