नवी दिल्ली - BJP Preparation for Loksabha ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यातच आता भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०२४ ची निवडणूकभाजपासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने सर्व नेत्यांना एक्शन मोडमध्ये आणले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी विविध बैठका घेतल्या जात आहेत. त्यात पक्षाचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांना याबाबत आदेश दिलेत. येत्या ३० जानेवारीच्या आत लोकसभा मतदारसंघनिहाय कार्यालये उघडण्याची सूचना पक्षाकडून करण्यात आली आहे.
भाजपानं प्रदेश पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, लोकसभा निवडणुकीची तारीख, पक्षाचे उमेदवार यांच्या नावाची वाट न पाहता सर्व लोकसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालये उघडा. त्यामुळे लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी पक्ष मतदारसंघात कार्यालये थाटणार आहेत. त्याठिकाणी निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, बैठका आणि सर्व हालचालीचे केंद्र असेल. आतापर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यावर लोकसभा मतदारसंघात मध्यवर्ती निवडणूक कार्यालये उघडली जात होती. मात्र यंदा भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने आधीच तयारी सुरू केली आहे.
निवडणूक खर्च कमी करण्याचे निर्देशत्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठांनी निवडणुकीत प्रदेश संघटनांकडून खर्च कमी करण्याची सूचना दिली आहे. कार्यकर्त्यांनी झेंडे, बॅनर, पोस्टर, वाहन इत्यादींवर खर्च कमी करावा याची जबाबदारी प्रदेश कार्यालयांची असेल. तर पैसे खर्च करून निवडणुका जिंकणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. जी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे आली आहे असा मेसेज लोकांपर्यंत कार्यकर्त्यांना पोहचवावा असंही सांगण्यात आले आहे.
याआधी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २ दिवसांची बैठक झाली. ज्यात १० टक्के मतांची टक्केवारी वाढवून ५० टक्के मते आणि मोठ्या फरकाने निवडणुकीत विजय मिळवण्याचे टार्गेट ठेवले आहे. यंदा पक्षाचे लक्ष नवीन मतदारांवर आहे. नवीन मतदारांसाठी संमेलनाची सुरुवात २४ जानेवारीपासून युवा मोर्चा करेल. भाजपा युवा मोर्चा देशभरात ५ हजार संमेलन घेईल. त्यातून नवीन मतदारांना जोडण्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली जाणार आहे.