BJP Questions Congress Candidates List: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज(दि.8 मार्च) आपल्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत खासदार राहुल गांधी यांना पुन्हा एकदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता यावरुन भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली.
राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघाऐवजी पुन्हा एकदा वायनाडमधून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल अमित मालविय यांनी बोचरी टीका केली आहे. मालविय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार नाहीत? घाबरलात?' अशी बोचरी पोस्ट मालविय यांनी केली. यासोबतच दक्षिण भारत वेगळा देश म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या डीके सुरेश यांना तिकीट देण्यावरुन काँग्रेसवर निशाणा घातला.
'भारताची फाळणी हा काँग्रेसचा अजेंडा'डीके सुरेश यांच्या जुन्या विधानाच्या आधारे अमित मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 'कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश यांनी दक्षिण भारत वेगळा करण्याची मागणी केली होती. त्यांना काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले आहे. भारताची फाळणी करणे, हा काँग्रेसचा अजेंडा आहे. त्यांच्यापासून सावध रहा,' अशी टीका मालविय यांनी केली.
काय म्हणाले होते डीके सुरेश?केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डीके सुरेश यांनी अर्थसंकल्पाबाबत दक्षिण भारतातील राज्यांवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांनी दक्षिण भारत हा हिंदी भाषिक राज्यांपासून वेगळा देश करण्याची मागणी केली होती. डीके सुरेश कुमार म्हणाले होते की, आम्हाला आमचा पैसा हवा आहे, मग तो जीएसटी असो, सीमाशुल्क असो किंवा प्रत्यक्ष कर असो, आम्हाला आमचा हक्काचा वाटा हवा आहे. जर हा प्रश्न सुटला नाही, तर दक्षिणेला वेगळा देश बनवावा लागेल.