लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून आघाडी-युतीचे राजकारण सुरू झाले आहे. ‘मिशन ४००’ लक्षात घेता भाजपने दक्षिणेत आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनसेना पक्षाशी हातमिळवणी केली, दुसरीकडे बिजू जनता दलासोबत जागावाटपाबाबत तोडगा न निघाल्याने ओडिशातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी शनिवारी संयुक्त निवेदन जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले.
बिहारमध्ये अनेकांची घरवापसी?
पाटणा : राजदसह अन्य पक्षांतून गेलेल्या अनेकांना भाजप व जदयूकडून लोकसभा उमेदवारीची अपेक्षा आहे, परंतु केवळ ४० जागा असल्याने किती जणांना उमेदवारी मिळेल, हे सांगता येत नाही. अशा स्थितीत अनेकांची घरवापसी होऊ शकते.
हेमब्रम यांचा पक्षाला रामराम
कोलकाता : भाजपचे झारग्राम लोकसभा मतदारसंघाचे खासदार कुणार हेमब्रम यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “वैयक्तिक कारणांमुळे” आपण लोकसभेचा नव्हे, तर पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले.
कमल हासन द्रमुकसोबत
चेन्नई : अभिनेता कमल हासन यांच्या मक्कल निधी मैयम (एमएनएम) पक्ष सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रमुक) नेतृत्वातील आघाडीत सामील झाला. द्रमुकने त्यांना लोकसभेऐवजी २०२५ च्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक जागा देऊ केली.
ओडिशात युतीची चर्चा अनिर्णीत
भुवनेश्वर : ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाशी जागा वाटपाबाबत पेच फसल्याने भाजपची निवडणूकपूर्व युतीबाबत चर्चा अनिर्णीत राहिली. दिल्लीतून भुवनेश्वरला परतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल म्हणाले, नेत्यांशी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तेथे युती वा जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही. भाजप लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवेल. दुसरीकडे बिजेडीचे नेते व्ही. के. पांडियन आणि प्रणव प्रकाश दास यांनीही याबाबत मौन पाळले.