BJP Attacked Rahul Gandhi: लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी 'शक्ती' संदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर भाजपने त्यांच्यावर चौफेर हल्ला सुरू केला. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर थेट हिंदुविरोधी असल्याची टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधी ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा अपमान करतात आणि हिंदू धर्माविरोधात वक्तव्ये करतात, ही त्यांची सवय आहे. हिंदूंच्या श्रद्धेवर वारंवार आघात करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. हिम्मत असेल तर इतर धर्मांबद्दल बोलून दाखवावे, पण बोलता येत नाही. ते निवडणुकीपुरते हिंदू आहेत. निवडणुका आल्या की, त्यांना हिंदू आठवतात. शक्तीबाबत केलेले त्यांचे वक्तव्य अपमानास्पद आहे. यातून त्यांनी देशाचा अपमान केलाय. काँग्रेस आता महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आता माओवादी, फुटीरतावादी विचारांवर चालतोय.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हिंदू धर्मातील शक्तीविरोधात लढत आहोत. भारताची शक्ती ही दुर्गा आहे, काली आहे. शक्ती ही देशाची प्रेरणा आहे. हिंदू धर्माचा द्वेष करण्यात राहुल गांधी आणि स्टॅलिन किंवा ए राजा यांच्यात काहीही फरक नाही. राहुल गांधी युरोपात जाऊन भारतीय संस्कृतीवर टीका करतात. अमेरिकन शिष्टमंडळाशी संवाद साधताना हिंदू दहशतवादी धोकादायक असल्याचे बोलले. त्यांनी सावरकरांबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या होत्या. दरबारी संस्कृतीमुळे काँग्रेस बरबाद होत आहे. आम्हाला विरोधक हवा आहे, पण त्यांना सुधारण्याची जबाबदारी आमची नाही. ते स्वतःचा नाश करत आहेत, अशी टीकाही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केली.