नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत तीन मूर्ती भवन परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपच्या खासदारांना सांगितले की, सर्व माजी पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे.सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात ६ एप्रिलपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी सुरू करण्यात आलेल्या योजना आणि कार्यक्रमांचा लोकांपर्यंत प्रचार करण्यासही सांगितले.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधानांना समर्पित संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत.या बैठकीत सहभागी असलेल्या एका नेत्याच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे सर्व माजी पंतप्रधानांचा समर्पित संग्रहालयाचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, माजी पंतप्रधानांमध्ये भाजपचे एकच पंतप्रधान आहेत. तथापि, देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने सर्वांचा आदर-सन्मान केला पाहिजे. आम्ही माजी पंतप्रधानांचा आदर केला आहे.
पक्षाभिनिवेश न बाळगता सर्व पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. मोफत धान्य योजनेला आणखी सहा महिने मुदतवाढ दिल्याबद्दल भाजप संसदीय पक्षाने पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले, असे केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रीय मान्यतेचे हे एकप्रकारे लोकशाहीकरण असून, आमच्या सर्व माजी पंतप्रधानांप्रति कृतज्ञतेचे अभिव्यक्ती आहे, असे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.