भोपाळ : मध्य प्रदेशमधील विधानसभेसाठीच्या उमेदवारांची यादी रातोरात रद्द करण्यात आल्यानंतर भाजपने 177 जागांसाठी आज पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधानीतून लढणार आहेत. यासोबतच मिझोरामच्या 24, तेलंगणाच्या 28 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
काल दिवसभर भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात जागावाटप आणि उमेदवारांच्या नावावरून चर्चा झाली होती. शिवराजसिंह हे यापूर्वी दोन जागांवरून निवडणूक लढणार असल्याचे वृत्त होते. मात्र, त्यांना बुधनी मतदारसंघच देण्यात आला आहे. तर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राहिलेली माया सिंह यांचा ग्वाल्हेर मतदारसंघातून पत्ता कापला गेला आहे. तर माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या गोविंदपुरा आणि माजी मंत्री कैसाश विजयवर्गीय यांच्या महू मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात येणार आहे. तोमर यांचे मंधाना मतदारसंघासाठी नाव जाहीर करण्यात आले आहे. ते सध्या मोदी सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री आणि ग्वाल्हेरचे खासदार आहेत. तर शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री यशोधरा राजे यांना शिवपुरी मतदार संघातून आणि गौरीशंकर शेजवार यांच्या जागी त्याचा मुलगा मुदित याला सांचीचे तिकीट देण्यात आले आहे. व्यापम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्या भावाला उमाकांत शर्मा यांना सिरोंजचे तिकिट देण्यात आले आहे.