नवी दिल्ली - मी शेतकऱ्याचा मुलगा, कमकुवत नाही, देशासाठी मरेन. मी खूप सहन केले असं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संतापलेल्या अवस्थेत विरोधकांना सुनावले. अदानी मुद्द्यांवरून आणि अविश्वास प्रस्तावावरून विरोधक सभागृहात गदारोळ करत होते. त्यावेळी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांना तुम्ही २४ तास हेच काम करता असं सभापतींनी म्हटलं. एका शेतकऱ्याचा मुलगा इथं का बसलाय असं तुम्हाला वाटतं असेही सभापती जगदीप धनखड यांनी म्हटलं.
राज्यसभेत गदारोळावेळी सभापती जगदीप धनखड म्हणाले की, मी वेदना समजू शकतो. डोळ्याने पाहू शकतो. मेहरबानी करून विचार करा. मी आदर द्यायला कुठेही कमी पडलो नाही. मी खूप सहन केले. आज शेतकरी केवळ शेतीपर्यंत मर्यादित नाही. आज शेतकरी सर्व ठिकाणी कार्यरत आहे. सरकारी नोकरी, उद्योग सगळीकडे आहे. तुम्ही माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला हा तुमचा अधिकार आहे. त्यावर चर्चा व्हावी हा अधिकार आहे, तुम्ही काय केले? संविधानचा अवमान करताय. तुमचा प्रस्ताव मिळाला आहे आता १४ दिवसानंतर त्यावर निर्णय होईल असं सभापतींनी सांगितले.
कुठल्याही परिस्थिती कमकुवत होणार नाही
आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभापती रागावल्याचं दिसून आले. त्यांनी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांना सुनावले. प्रमोदजी, तुम्ही अनुभवी नेते आहात. तुम्ही काय काय बोलला, खरगेंचा मी आदर करतो, १०० टक्के करतो परंतु माझ्यावर उपकार करा. तुम्हाला वाटत असेल तर मला भेटा, माझ्यासाठी वेळ नसेल तर मला सांगा मी येतो. मी कुठल्याही परिस्थिती कमकुवत होणार नाही. सर्वांचे ऐकून घेईन, पूर्ण दिवस ऐकेन. देश विरोधी काम करू देणार नाही असंही सभापती जगदीप धनखड यांनी बजावले.
मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
राज्यसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींवर तुम्ही संविधानाचा अवमान केलात, आम्ही तुमचं कौतुक करायला इथं आलो नाही. सभागृह नियमानुसार चालायला हवे. जर तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असेल तर आम्ही मजुराची मुले आहोत. जर तुम्ही आम्हाला अपमानित करत असाल तर आम्ही तुमचा आदर कसा करायचा असा सवाल खरगेंनी विचारला.