- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : घराणेशाहीच्या राजकारणाला कठोरपणे दूर सारल्यामुळे लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाला, असे भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगत असतात. परंतू, आज भाजपा हा एकमेव असा राष्ट्रीय पक्ष आहे की घराणेशाहीचा मुकुट त्याच्या मस्तकावर असून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्याही हे चांगलेच लक्षातही आले आहे.भाजपामध्ये उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्यात दोन राजकीय कुटुंबे घराणेशाहीत आघाडीवर आहेत. या दोन कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्य सक्रिय राजकारणात असून त्यांच्याकडे सरकारमध्ये आणि कायदेमंडळातील पदे आहेत. ज्या पक्षाने राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला, तोच ती जोपासतो आहे.
या आधीच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये चौधरी वीरेंद्र सिंह हे पोलाद मंत्री होते. त्यांनी स्वत:च पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचे चिरंजीव बिरजेंदर सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) नोकरी सोडली तीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर. त्यांना लोकसभेचे तिकीट मिळालेही. ते हरयाणातील हिसार लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने वियजी झाले.
वीरेंद्र सिंह हे सर छोटू राम यांच्या कुटुंबातील व छोटू राम यांचे नातू. छोटू राम यांच्या घराण्याचा जाटांवर असलेला प्रभाव हुडांना पराभूत करण्यासाठी व आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यासाठी वीरेंद्र सिंह हे उपयोगाचे ठरणार होते. भाजपाने वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी प्रेमलता यांना जिंद विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. आता त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य कायदेमंडळात पदावर आहेत.
भाजपामध्ये कल्याण सिंह राज्यस्थानचे राज्यपाल असून राज्यपालपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळविण्यास ते इच्छुक आहेत. त्याचे पुत्र राजवीर सिंह एटा लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. 1017 मध्ये औतली विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. अशा प्रकारे कल्याण सिंह यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.