नवी दिल्ली- राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन हात दूर आहे. मायावतींच्या बसपाच्याही दोन जागा मध्य प्रदेशात निवडून आल्या आहेत. मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानं काँग्रेसला बहुमताएवढं संख्याबळ प्राप्त झालं आहे.मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. तर मायावतींच्या बसपाला 6 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्यावर काँग्रेसही राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करू शकणार आहे. राजस्थानात बहुमतासाठी 100 जागांची आवश्यकता असून, मायावती आणि काँग्रेसच्या जागांची संख्या 105 होते आहे. त्यामुळे साहजिकच या राज्यातही काँग्रेसचंच सरकार येणार आहे.
- कोणाला मिळणार राजस्थान ?
राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोन्ही नेते आपापल्या प्रभागांत लोकप्रिय आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही स्वतःच्या विभागातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले आहेत. त्यामुळेच दोघांचाही मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचं तरुण नेतृत्व आहे. त्यांनी राज्यात पक्षाला चांगली उंची मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षानं अजमेर आणि अलवर या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. गेहलोत यांनी यापूर्वीही राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही गेहलोत यांनी मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हे राहुल गांधी ठरवतील, असं म्हटलं होतं. काँग्रेस पक्ष मजबूत करणं हा माझा उद्देश असल्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे राहुल गांधी स्वतःचे तरुण साथीदार असलेल्या पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवतात का, की गेहलोत यांना पुन्हा संधी देतात हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
- कमलनाथ किंवा सिंधिया, कोणाला मिळणार मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद?
मध्य प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिलं होतं. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचं वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढं मोठं यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.