लखनऊः काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे, देशात अराजकतेची परिस्थिती आहे, असं म्हणत मायावतींनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. बहुजन समाज पार्टी(BSP)च्या मायावतींनी बुधवारी राजधानी लखनऊमध्ये 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जशा प्रकारे काँग्रेसच्या पूर्वीच सरकारनं काम केलं आहे, त्याच पद्धतीनं भाजपाचं काम सुरू आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच तणाव आणि अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लखनऊमधल्या मॉल एव्हेन्यूस्थित बसपा मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गरीब आणि दलित विरोधी कृत्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून बाहेर हाकललं. आता सत्तेत आलेल्या भाजपाचीसुद्धा त्याच मार्गानं वाटचाल सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची दशा खालावत चाललेली असून, देशाची अवस्था वाईट आहे. केंद्राच्या चुकीच्या नीतींमुळे आज देशातील गोरगरीब जनता त्रासलेली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:11 AM