राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिले, माजी आमदाराचे वक्तव्य; काँग्रेसकडून स्टिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:24 AM2020-11-03T05:24:17+5:302020-11-03T05:24:45+5:30
BJP pays Rs 5 crore for resignation, statement of former MLA : गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले.
अहमदाबाद : आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिल्याचे गुजरातमधीलकाँग्रेसचे तत्कालीन आमदार सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. या व्हिडिओमध्ये सोमाभाई पटेल यांनी म्हटले आहे की, आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपाने मला पैसे दिले होते. नाही तर कारणाशिवाय आमदार आपल्या पदाचा राजीनामा का देईल? राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी कोणालाही १० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले नाहीत. काही जणांना निवडणुकीत उमेदवारी, तर काहींना पैसे देण्यात आले.
गुन्हा दाखल करा
गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा म्हणाले की, भाजपाने आमदारांच्या खरेदी-विक्रीचा घोडेबाजार सुरू केला. भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा भाजपने आमदारांना विकत घेण्यासाठी वापरला. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे गुजरातमधील खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणीही अमित चावडा यांनी केली.