मुंबई- 'जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपीची युतीच मुळात देशविरोधी आणि अनैसर्गिक होती. जम्मू-काश्मीरमधील युतीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असं आमच्या पक्षप्रमुखांनी यापूर्वीच म्हटलं होतं. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर द्यावे लागणार असल्यामुळेच त्यांनी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला', अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपाने जम्मू-काश्मीरमधील सरकारमधून पाठिंबा काढल्याचं भाजपाचे नेते राम माधव यांनी मंगळवारी दुपारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यामुळे आता राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आलं आहे.
दरम्यान, राम माधव यांनी राज्यातील गेल्या तीन वर्षांतील अपयशाचे सर्व खापर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक (पीडीपी) पक्षावर फोडलं. भाजपाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटले आहेत. मात्र, ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचं ते म्हणाले.