नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपने आतापासूनच लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. २०१९ मध्ये ज्या ठिकाणी पक्षाची कमकुवत स्थिती होती, त्या भागात पकड मजबूत करण्यावर भर देत आहे.
भाजपच्य एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, निवडक मतदान केंद्रांवर पकड मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरे आयोजित केले जातील. पक्षाची पकड सैल का झाली? यामागची कारणे शोधून निवडणुकीपूर्वीच या मतदान केंद्रांवर पक्षाची स्थिती मजबूत केली जाईल. संघटनात्मक स्तरावरील रिक्त पदांची जबाबदारी भक्कम कार्यकर्त्यांवर सोपविली जाईल. मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी थेट संपर्कासाठी मतदार यादी पानप्रमुखांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय सोशल मीडियाचाही उपयोग केला जाईल.
चार सदस्यांची समिती स्थापनदेशभरातील शंभर लोकसभा मतदार संघांतील ७४ हजार मतदान केंद्रांवर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी बी. जे. पांडा, दिलीप घोष, सरचिटणीस सी. टी. रवी आणि अनुसूचित जाती मोर्चाचे लाल सिंह आर्य यांना देण्यात आली आहे. या मतदान केंद्रांपैकी बहुंशी ठिकाणी अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे. बहुंशी मतदान केंद्रे भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील आहेत. यावेळी भाजप प. बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू राज्यांवर यावेळी जास्त लक्ष केंद्रित करणार आहे.