Manish Sisodia On Manoj Tiwari: दिल्ली महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी भाजप आणि आम आदमी पार्टीमधील वातावरण तापयला लागले आहे. भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. जनता त्यांना मारहाण करू शकते, असे ते म्हणाले आहेत. त्यावर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मनोज तिवारीच्या अटकेची मागणी करत भाजपवर मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत सिसोदिया म्हणाले की, मनोज तिवारी म्हणताहेत की, कोणीतरी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करू शकतो. हे घडू शकते हे त्यांना कसे कळले? मनोज तिवारी यांच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही आज FIR दाखल करू आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनोज तिवारीला अटक करण्यात यावी, अशी मागणी मनीष सिसोदिया यांनी यावेळी केली.
संजय सिंह हेदेखील संतापले
मनोज तिवारी यांच्या या वक्तव्यावर आपचे खासदार संजय सिंह देखील संतापले आहेत. त्यांनी पलटवार करत भाजपला निवडणूक जिंकता येणार नसल्याचा दावा केला. तसेच, भाजपवाले सीएम केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत असल्याचा आरोपही केला. मुख्यमंत्र्यांचे डोळे-पाय तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, तरीही निवडणूक आयोग डोळे झाकून बसले आहे, असंही संजय सिंह म्हणाले.
काय म्हणाले होते मनोज तिवारी?मीडियाशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले की, कोणीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे डोळे फोडू शकतो आणि त्यांचे पाय तोडू शकतो. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की, केजरीवालांना सुरक्षा द्या, कारण लोक त्यांना कुठेही मारहाण करतील. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल असेही तिवारी म्हणाले.