नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकाला अवघे 24 तास शिल्लक आहेत. मात्र त्याआधी विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमधून एनडीए 300 चा आकडा पार करत बहुमतात सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तविला आहे. टीव्हीवर दाखविणाऱ्या या आकड्यांमुळे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी खूश असले तरी आरएसएस, भाजपाचे काही ज्येष्ठ नेते आणि प्रत्येक राज्यात प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांना यावर विश्वास होत नाही. मेरठमधील एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने 23 मे रोजी प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भाजपाच्या जागा कमी होतील अशी चिंता व्यक्त केली आहे.
सरकारी कार्यालयातही आकडेवारीवरुन संशय अनेक मंत्रालयातील केंद्रीय सचिव स्तरावरील अधिकारी निवडणूक सुरु होण्यापासून ग्राऊंडवरील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन एनडीएमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने तयारीही सुरु केली आहे. लोकसभा निकालांबाबत सामान्य जनतेप्रमाणे ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. निवडणुकीत ड्युटी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासूनही सचिव माहिती घेत आहेत. कायदे मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानेही सांगितलं की एक्झिट पोलमधील आकडेवारी जास्त प्रमाणात वाढवून सांगितली जात आहे असं वाटतं. गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही 23 मे रोजी निकाल अनपेक्षित लागू शकतात असं वर्तवलं आहे.
भाजपाच्या एका नेत्याच्या मते, अनेक स्तरावरुन माहिती घेतल्यानंतर एनडीएसोबत भाजपाला दिल्लीत 5, गुजरात 21, मध्य प्रदेश 18, छत्तीसगड 4, राजस्थान 19, उत्तर प्रदेश 38, बिहार 28, झारखंड 5, पश्चिम बंगाल 11, ओडिशा 8, कर्नाटक 16, हिमाचल प्रदेश 4, उत्तराखंड 4, हरियाणा 6, पंजाब 4, महाराष्ट्र 31, आसामसह पूर्वांचल राज्यात 17, तामिळनाडू 4, गोवा 2, जम्मू काश्मीर 2 आणि चंदिगड 1 अशाप्रकारे भाजपाला जागा मिळेल. जवळपास एनडीएला 248 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्यांमध्ये दिवसभर ऑफ द रेकॉर्ड चर्चा सुरु होती. सर्वांनुमते एक्झिट पोलचे आकडे खूप वाढवून दाखवत असल्याचं बोललं जात आहे.