"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:42 AM2023-01-25T11:42:26+5:302023-01-25T11:45:04+5:30
DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे सातत्याने आपल्या विधानमुळे चर्चेत असतात. यावेळी, त्यांनी भाजपने (BJP) विधानसभा अपवित्र केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आपला पक्ष सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू, असेही म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपवर निशाणा साधताना डीके शिवकुमार म्हणाले की, "तुमच्या सरकारला फक्त 40-45 दिवस उरले आहेत. आपला तंबू बांधण्याची वेळ आली आहे. आम्ही डेटॉलने विधानसभा स्वच्छ करू. शुद्धीकरणासाठी माझ्याकडे गोमूत्रही आहे. हे दुष्ट सरकार गेले पाहिजे, हीच जनतेची इच्छा आहे. बोम्मईजी, तुम्ही सर्व मंत्र्यांना लवकर पॅक अप करायला सांगितले तर बरे होईल."
There're only 40-45 days left for your govt. It's time to pack your tents. We'll clean Vidhana Soudha with Dettol. I also have cow urine for purification, this evil govt should go. That's what people want. Bommai, tell your ministers to pack up: Karnataka Cong chief DK Shivakumar pic.twitter.com/qACqFij6Gc
— ANI (@ANI) January 25, 2023
काँग्रेसच्या कार्यकाळात 'टेंडरशुअर' प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या तक्रारीच्या पहिल्या दिवसापासून भाजप काँग्रेसच्या निशाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर मोठा आरोप केला आहे. या काळात 35,000 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, के. सुधाकर यांच्या आरोपाला उत्तर देताना डीके शिवकुमार म्हणाले की, "भाजप गेली साडेतीन वर्षे काय करत आहे. ते सत्तेत होते आणि त्यांनी चौकशीचे आदेश देऊन, चौकशी करायला हवी होती. भाजपकडे 40 टक्के कमिशनचा 'ब्रँड' आहे आणि त्यांना तो लपवायचा आहे. त्यामुळेच ते वारंवार काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत."