नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आढळून येणाऱ्या कोरोना रुग्यांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP Pragya Singh Thakur) यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अजब विधान केलं असून ते सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते" असं देखील याआधी ठाकूर यांनी म्हटलं आहे. मात्र आता "आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात" असा दावाच प्रज्ञा सिंह ठाकूर केला आहे. ठाकूर यांच्या या नव्या विधानावरून अनेकांनी जोरदार निशाणा साधला आहे.
"मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते"
ठाकूर यांनी गोमूत्राचे फायदे सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील कोरोना दुसऱ्या लाटेच्या कालावधीदरम्यान त्यांनी असच एक अजब विधान केलं होतं. मी कोरोनापासून वाचले. कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते असं म्हटलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी "गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. म्हणूनच मला करोनाचा संसर्ग झाला नाही" असं सांगितलं होतं. तसेच कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचविला होता. हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल असा देखील सल्ला दिला होता.
"या आपण सर्वांनी मिळून कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. 25 जुलैपासून ते 5 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा" असं ट्विट प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,29,45,907 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,618 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 330 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,225 लोकांना जीव गमवावा लागला आहे.